पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गारवा बिर्याणीच्या व्यवस्थापकाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून अज्ञात इसमांनी खून केल्याची धक्कादायक घटना धायरी येथील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे शनिवारी (ता.२९) मध्यरात्री घडली आहे.
भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी ) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी भरत यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले. आणि त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून केला. आणि हल्लेखोर तेथून पसार झाले.
या घटनेची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले. तसेच तपासणी केली असता, भरत यांच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, भरत कदम यांच्यावर चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांनी त्यांचा खून का केला, खुनामागील नेमके कारण काय? याचा शोध सिंहगड रोड पोलीस घेत आहेत.