नवी दिल्ली : देशातील बहुतांश लोक हे मोठी रक्कम जमवण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. पण अशा लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आता 2024 हे वर्ष भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी नवीन आव्हाने निर्माण करू शकते. बँकांना निधीची कमतरता भासत असल्यामुळे कर्ज वितरणाची प्रक्रियादेखील यावर्षी मंद होऊ शकते, असे जागतिक रेटिंग एजन्सी ‘एस अँड पी’ने म्हटले आहे.
बँका ज्या वेगाने कर्ज वितरण करत आहेत. त्याच वेगाने ठेवी मिळत नाहीत. साहजिकच कर्ज वाटपासाठी पुरेशा निधीअभावी हे वर्ष सुस्त असू शकते, असे ‘एस अँड पी’ या एजन्सीने म्हटले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात भारतीय बँकांची पतवाढ, नफा आणि मालमत्तेची गुणवत्ता चांगली राहील. ठेवी त्याच गतीने वाढत नसल्यामुळे त्यांना त्यांची कर्ज वाढ कमी करण्यास भाग पाडले जाऊ शकते.
एफडीवर वाढू शकते व्याज
लोक जास्त व्याजदरासह इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे बँकांसारखे पारंपरिक पर्याय कमी झाले आहेत. साहजिकच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांना एफडीवर अधिक व्याज द्यावे लागेल. तरच त्यांच्या ठेवी वाढतील आणि त्यांना कर्ज वाटप करता येईल. त्यामुळे आता एफडीवर व्याज वाढू शकते, असेही बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.