नसरापूर, (ता. भोर) : कोळवडी (ता. भोर) येथे जलजीवन योजनेतील ग्रामपंचायत विहिरीचे काम सुरू असताना क्रेन चा वायररोप तुटून क्रेन चे बकेट विहिरीत पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंकुश प्रभाकर गेडाम (वय-२३, रा. गडचिरोली) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजेंद्र रामानंद भारद्वाज (वय-४९, रा. उत्तरप्रदेश ) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना कोळवडी येथे आज सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोळवडी येथील नसरापूर- वेल्हा रोडलगत असणाऱ्या ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू होते. दुपारची जेवणाची सुट्टीनंतर क्रेनच्या बकेटमध्ये बसवून कामगारांना खाली सोडत असताना अचानक क्रेनची वायररोप तुटून बकेट ५० फूट खाली पडला. यावेळी वायर रोपचा लोखंडी हुक बकेटमध्ये असलेले अंकुश यांच्या डोक्यात पडल्याने ते जागीच ठार झाले. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णवाहिका बोलावून नसरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, विहिरीत अडकलेले सर्व कामगार गडचिरोली जिल्ह्यातील तसेच काही परप्रांतीय आहेत. विहिरीत इतर काम करत असलेले कामगार दोन महिला, आठ पुरुषांचा समावेश असून त्यांना दुसऱ्या क्रेनच्या साह्याने खाटेवर बसवून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेतली असून घटनेस जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.