मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मतदारसंघातील सुजाण नागरिकांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केल्याने आपण निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी येत्या ३ मेपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यासाठी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, तर महायुतीकडून भाजपचे अॅड. उज्वल निकम यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, या मतदारसंघात आता आणखी एक हायप्रोफाईल उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई शहराचे पोलीस आयुक्त होते. मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करत संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी आघाडी सरकारने वर्णी लावली होती. मात्र, त्यानंतर काही काळातच तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले होते. भाजपच्या आरोपानंतर ईडी आणि सीबीआयने संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. त्यानंतर पांडेंना अटक झाली, पाच महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला.
संजय पांडे हे कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जायचे. पण महायुती व आघाडीच्या राजकारणात पांडे यांचा बळी गेल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. तेच पांडे आता उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक चर्चेत येणार आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात संजय पांडे म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्याप अंतिम नाही. मात्र, मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत आहे. याबद्दल कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल.