बारामती : व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून लहान भावाने चाकूने वार करून थोरल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना माळेगाव (ता. बारामती) येथे शुक्रवारी (ता.२८) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कल्पेश अरुन धुळप (वय-२६ रा. तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, बु ता. बारामती जि. पुणे) असे खून झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. तर आरोपी मंथन अरुण धुळप (वय-२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आई सुरेखा अरुण धुळप, (वय-५० रा. तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु (ता. बारामती जि. पुणे), यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश धुळप आणि आरोपी मंथन धुळप हे दोघे सख्खे भाऊ आहेत. कल्पेश हा मोठा तर मंथन हा लहान भाऊ आहे. कल्पेश याला आठ दिवसापुर्वी चप्पलच्या व्यवसायाकरीता १ लाख ४० हजार रुपये भांडवल दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनंतर दिलेल्या भांडवलाचे काय केले असा जाब लहान भाऊ मंथनने मोठा भाऊ कल्पेशला विचारला होता.
त्यानंतर कल्पेशने सदरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगून आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हटले. अरोपी मंथन रागावून कल्पेशच्या अंगावर धावून गेला. यावेळी कल्पेश व मंथनच्यात मारहाण झाली. कल्पेशने हाताने बुक्याने छातीवर मारहाण केली. त्यानंतर आरोपी मंथनने रागातून घरातील कपाटातील चाकुने कल्पेशच्या मानेवर व छातीवर चाकूने जबर वार करुन खून केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, माळेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आई सुरेखा धुळप यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी मंथन धुळप याला अटक केली आहे. आरोपी मंथन यास वैद्यकीय तपासणी नंतर उपकारागृहात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे करीत आहेत.