पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतून बाळासाहेब लांडगे यांची काही दिवसापूर्वी हकालपट्टी करण्यात आली आहे. तरीही बाळासाहेब लांडगे यांनी कुस्ती स्पर्धा भरविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे प्रधान सचिव व्ही. एन. प्रसुद यांनी परिपत्रक काढले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी बाळासाहेब लांडगे यांचा कोणताही संबंध नसून, त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत किंवा स्पर्धेत सहभागी होऊ नये, अशा सूचना भारतीय कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. तसे आढळून संबंधित पैलवान, प्रशिक्षक, रेफ्री, जिल्हा व राज्य कुस्तीगीर संघ आणि संबंधित व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा आदेश प्रसुद यांनी यांनी दिला आहे.
लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. संजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती नेमलेली आहे. शिवाय परिषदेची नव्याने निवडणूक घेण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बाळासाहेब लांडगे स्वतःला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रात कुस्ती स्पर्धा भरविण्याचा, तसेच महासंघाच्या निर्णयाविरोधात कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट बेकायदेशीर असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
“भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघावर सोपवली आहे. त्यामुळे बाळासाहेब लांडगे यांनी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून महाराष्ट्रातील कुस्तीगीर व कुस्तीशौकीनांची दिशाभूल करु नये. महाराष्ट्रातील कुस्तीगीर हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्याशी व करिअरशी बाळासाहेब लांडगे यांनी खेळू नये,” असे पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले आहे.