लोणी काळभोर : महावितरण कंपनीचे उरुळी कांचन (ता. हवेली) उपविभागाअंतर्गत थेऊर शाखा येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता सुरेश दगडूजी माने यांना कामात कुचराई केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान करून विजग्राहक व महावितरण कंपनीचा महसूल बुडविल्याप्रकरणी तसेच वीज मीटर मधील वीजचोरी लपविण्यासाठी वीज मीटर जाळणे, मीटर बदलल्यानंतर रिडींग प्रणाली चुकीची भरुन कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. यामुळे रयत शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे.
मिळालेल्या महितीनुसार, कोलवडी (ता. हवेली) येथील ग्राहक शरद वामन पवार यांना बांधकामाकरीता ३ फेज वीज पुरवठा करण्यात आला होता. सदर मीटर जळाल्यामुळे बदलण्यात आला. परंतु तो प्रणालीमध्ये चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे त्याआधारे उरुळीकांचन उपविभागामधील बिलींग विभागाने २१ महिन्याची चुकीची बील दुरुस्ती करुन डिसेंबर २०२१ मध्ये ग्राहकांस रुपये ६९ हजार ७४४ रूपयाचे क्रेडीट दिले.
यामुळे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. या मीटरवर सप्टेंबर २०१९ पर्यंतचा वीज वापर ३१५ युनिटच्या आसपास प्रतिमाह असतांना ऑक्टोंबर २०१९ नंतर अचानक वीज वापर कमी झालेला असतांना व मीटर बॉडीज मागील बाजूस छिद्र पाडलेले असतांना मीटर बाहेरुन जळालेला असुन देखील चोरीच्या दृष्टीने पवार यांनी कारवाई केली नाही.
दरम्यान ७ जुलै रोजी विभागीय कार्यालयाच्या समितीने थेऊर शाखेमध्ये जावुन मीटर तपासणी केली असता मीटर जळालेल्या अवस्थेत शाखा कार्यालयामध्ये आढळून आला.सदर ग्राहकाचे वीज बील तपासले असता ग्राहकाचे बिलावर वरील मीटर नंबर आढळून आला. ग्राहकाचा वापर सरासरी ६५०० युनिट प्रति महिना असा असताना ग्राहकांस मे २०२२ ते जून २०२२ चे बील ० युनिटचे जात होते.
ग्राहकाचा वापर हॉटेल साठी होत असून स्थळ तपासणीत तेथे दुसरा मीटर बसविण्यात आल्याचे आढळून आले. या मीटरची अंदाजे ३ महिन्यापासून गालीमध्ये रिप्लेसमेंट अद्यापही भरलेली नाही असे दिसून आलेले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता, तथा सक्षम अधिकारी, महावितरण, मुळशी विभाग माणिक रामू राठोड यांनी त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सदरील कार्यवाहीसाठी पाठपुरावा रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास कोतवाल महिला पुणे जिल्हा अध्यक्ष कल्पना गव्हाणे तालुका अध्यक्ष अनिल कोतवाल तालुका उपाध्यक्ष सुभाष तिकोळे व सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांनी केला.