माढा: माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रुपाने भाजपला मोठे दोन धक्के बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच सक्रिय झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे अकलूजमध्ये तीन सभा घेणार आहेत. फडणवीस यांनी सभा घेण्यापूर्वीच अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडले आहे. 27 एप्रिलला होणाऱ्या सभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील काँग्रेस नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. धवलसिंह मोहिते हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, आता अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात दुसरे मोहिते पाटीलभारतीय जनता पक्षाच्या बाजूने मैदानात उतरणार आहेत. धवलसिंह मोहिते हे माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असून त्यांचा अकलूज परिसरात प्रभाव आहे. धवलसिंह यांच्या रूपाने धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसणार आहे.