कराड : आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी आपला चावा घेणारा डास आपल्या सर्वांचा चांगल्या परिचयाचा आहे. डास हा एक छोटासा किटकच आहे. अगदी १५ मि.मी इतक्या लहान आकाराचा! जगभरात डासांच्या सुमारे ३५०० जाती आढळतात. डासांमधील नर पाना-फुलांच्या रसांवर आपली गुजराण करतो, मादी डासाला मात्र अंडयांची व्यवस्थित वाढ होण्याकरीता रक्ताची गरज असते. यामुळेच डास अनेक गंभीर आजारांचे रोगवाहक होतात, असे प्रतिपादन कराड तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पी.डी.जाधव यांनी केले आहे.
जागतिक हिवताप दिनानिमित्त तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रमाचे गुरुवारी (ता.२५) आयोजन करण्यात आले होते. यावेळी पी.डी.जाधव बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार, डॉ नितीन वांगीकर, शरद कांबळे, जामसिंग पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, धैर्यशील सपकाळ, आरोग्य सेवक रोहीत भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्य सेविका रजना कुंभार ,विद्या लोहार, सोनाली परीट, सुप्रिया पवार, आशा सेविका, गटप्रवर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जाधव म्हणाले, अंडी, अळी, कोष (पाण्यातील अवस्था) व पूर्णावस्था (पाण्याबाहेर) अशा डासांच्या चार अवस्था असतात. या तीनही अवस्था फक्त पाण्यातच जगू शकतात व त्यांच्या वाढीचा कालावधी ८ ते १० दिवसाचा असतो. तर पूर्णावस्थेतील डास पाण्याबाहेर राहतो. पूर्णावस्थेतील मादी डासांचे आयुष्यमान साधारणपणे २१ दिवस असते. तर नर डास फक्त ४ ते ५ दिवस जगू शकतात. तसेच डासांपासून संरक्षण न केल्यास हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या, जपानी मेंदूज्वर, हत्तीरोग असे रोग होण्याची शक्यता असते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार म्हणाले की, प्रत्येक हिवताप बाधीत रुग्णांनी त्यांच्या शरीरातील प्लास्मोडियम परोपजीवीचा संपूर्ण नाश करण्यासाठी हिवतापविरोधी समूळ उपचार घेणे आवश्यक आहे. व्हायवॅक्स प्रकारच्या हिवतापामधले समूळ उपचाराचा कालावधी १४ दिवसांचा असतो. तर फॅल्सीपेरम प्रकारच्या हिवतापामध्ये समूळ उपचाराचा कालावधी ३ दिवसांचा असतो. हिवतापविरोधी समूळ उपचार प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. समूळ उपचार अर्धवट घेतल्यास त्या रुग्णास हिवतापाचा त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो तसेच या रुग्णांमुळे परिसरात हिवताप पसरण्यास मदत होते.
दरम्यान, झोपताना किटकनाशक भारित मच्छरदाणी वापरा. घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसवा. हात, पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा, आवश्यक तिथे डास प्रतिबंधक अगरबत्तीचा वापर करा, किटकनाशक फवारणी करायाला आलेल्यानां सहकार्य करा. कोरडा दिवस पाळा, डासांचा उपद्रव टाळा, दर आठवडयाला घरातील पाण्याची भांडी रिकामी करा, पाणी साठवायची भांडी आतून स्वच्छ घासून, पुसून घ्या. घरावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा, घरातील पाणी साठवायच्या टाक्यांना झाकण नसल्यास जुन्या कपडयाने (धोतर, साडी इ.) झाका. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वांगीकर यांनी केले.