नागपूर : स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका प्राध्यापकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना नागपूर येथील सुधार प्रन्यास स्विमिंग पूलमध्ये घडली. संबंधित प्राध्यापकाला पोहता येत असतानाही ही दुर्घटना घडल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
कुणाल साल्पेकर (वय 36, रा. अभ्यंकरनगर) असे यामध्ये मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. अंबाझरी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 50 मीटर लांब आणि आठ फुट खोल जलतरण तलाव आहे. येथे एकाच वेळी जवळपास 60 ते 70 जलतरणपटू पोहण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी प्रशिक्षक आणि लाईफ गार्ड देखरेखीसाठी असतात.
कुणाल यांना चांगले पोहता येत होते. पण नेहमीप्रमाणे सायंकाळी ते पोहायला गेले होते. काही वेळ ते पाण्यातही उतरले. रात्री साडेआठच्या सुमारास पोहत असताना अचानक पाण्यात गटांगळ्या खावू लागले आणि पाहता पाहता खाली गेले. ते पोहण्यात तरबेज असल्याने कोणी फारसे लक्ष दिले नाही.
काही वेळानंतर कुणाल हे पोहताना दिसत नसल्याने सहकाऱ्यांचे लक्ष गेले. सहकारी आणि लाईफ गार्डनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढत पोलिसांना माहिती दिली. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.