अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा हा छत्रपती शिवरायांची राजधानी आहे. येथे पोवई नाक्यावरील शिवतीर्थ ऐन दिवाळीत अंधारात होता.त्याबाबत सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असताना आता महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुरावस्थेने लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन होऊ लागले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून जात आहे. आनेवाडी व तासवडे असे दोन टोल नाका आहेत. दररोज दीड ते दोन लाख रुपयांचा टोल गोळा केला जातो. पण, सुविधांचा अभाव आहे.टोल नाका म्हणजे सक्ती वसुली संचालनालय अशा शब्दात त्याचे सुशिक्षित वर्ग वर्णन करताना दिसत आहेत. येथील मिनी ठेकेदार हे लांबचे नसून भूमिपुत्र आहेत. बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याने अनेकदा भाकरी करपली पण, चूल बदलण्याचे धाडस कोणी दाखविले नाही.
ऐतिहासिक सातारा नगरीत ऐतिहासिक पद्धतीत स्वागत करणारे हे महामार्गावरील रस्ते म्हणजे नमुना आहे. स्थानिक नेत्यांनी टोलबंदीची गाजर (अल्टीमेटम) दाखवुन सातारकरांना खुष करून मनोरंजन केले होते. पुन्हा रोड व सर्व्हिस रोड हे खड्डेमय ठेवुन स्थानिक नेत्यांना गाजर दाखविले. स्थानिक प्रशासन ही त्यांच्यासमोर हतबल आहे. सामान्य जनतेने ही बाब लक्षात घेऊन आंदोलन होत नाही. कोल्हापूरच्या जनतेचे व तेथील नेत्यांचे आंदोलनाने सारखे कौतुक केले जाते. पण, साताऱ्यात टोल मुक्तीसाठी आंदोलन होत नाही. अशी साताऱ्याची तऱ्हा आहे.
जिल्ह्याचे पालक मंत्री यांचा वाहनांच्या सायरनचा आवाज सुध्दा टोल वसूल करणाऱ्या ठेकेदारांच्या पिलावळी ला ऐकू येत नाही. दोन खासदार व नऊ आमदार असूनही साधा सर्व्हिस रोड दुरुस्त होऊ शकत नाही. ही यांची कर्तबगारी सातारकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटा ते खेड दरम्यान सर्व्हिस रोड मधील खड्डे आता स्पर्धा करू लागले आहेत. याकडे कोणाचे ही लक्ष नाही. वाहन चालवताना चालकांनाच काळजी घ्यावी लागते. सातारा म्हणजे क्रांतिकारकांचा जिल्हा होता. आता तसा तो राहिला नाही. याची साक्ष मोठमोठे खड्डे देत असून येथील लोकप्रतिनिधी यांच्या कार्यक्षमता बाबत ही प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत. हे मात्र नक्कीच उघड होत आहे.