पुणे : शहरात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, शहरात मंगळवारी (दि. २३) कमाल तापमानाचा पारा ३९.६ अंशांवर आला आहे. तर, किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअस होते. शहरात मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन आकाश अंशतः ढगाळ झाले आहे. काही दिवसांपूर्वी ४२ अंशांवर गेले होते. पावसामुळे त्यात घट झाली आहे. तापमान ३७ अंशांपर्यंत आले होते, त्यात वाढ होऊन ते गेले काही दिवस ३९ अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा चटका कायम असला तरी काही काळ ढगाळ हवामानामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
येत्या २४ ते २६ एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे व मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर, २७ ते २९ एप्रिलदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. या दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे.