पुणे : हवेली तहसील कार्यालयातील (Haveli Tehsil office) अव्वल कारकूनाने तब्बल दीड लाख रुपये लाचेची मागणी केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अव्वल कारकुनावर खडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने हवेली महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नरेंद्र भानुदास ढोले (वय ४० वर्ष, पद अव्वल कारकून, तहसिलदारकार्यालय, हवेली, पुणे. (वर्ग-३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अव्वल कारकूनाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४७ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीची जमीन पश्चिम चक्राकार मार्गासाठी संपादित होत असून, सदर जमिनीची नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार यांना शासनाकडून ३४ लाख २० हजार ३४८ रुपये मिळणार होते. तक्रारदार यांच्या त्या जागेच्या सात-बारा उता-यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार, हवेली कार्यालयाकडून कमी होणार होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदार यांचे अर्ज प्रकरण हवेली तहसिलदार कार्यालयात प्राप्त झाले होते.
सात हजारांची लाच स्वीकारताना खेड भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टायपिस्ट महिला एसीबीच्या सापळ्यात
View this post on Instagram
दरम्यान, सदर अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी लोकसेवक नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांच्याकडे तहसिलदार यांच्याकरीता दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांच्याकडे हवेलीचे तहसिलदार यांच्याकरिता दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नरेंद्र ढोले यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.
हवेली तहसील कार्यालयाच्या थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे व त्यांच्या दोन सहका-यांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनांवर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्याने हवेलीतील महसूल विभागाची भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत. त्यामुळे हवेली तहसील कार्यालय व त्यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडलाधिकारी यांची कामगिरी गेल्या काही वर्षातील लाचखोरीच्या आकडेवारीतून अधोरेखित होत असल्याने हवेली तहसील कार्यालय भ्रष्ट व लुटमारीचे केंद्र बनले आहेत का? अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.