पुणे : पुणे जिल्ह्यात लोकसभेचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. आठवडे बाजारांमुळे मतदान केंद्रांना अडथळा येण्याची शक्यता आहे, असा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाला आहे. म्हणून लोकसभा निवडणुक प्रक्रियेच्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, शिरूर व मावळ लोकसभेचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी ज्या गावांमध्ये आठवडे बाजार भरतो अशा गावांच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेकडून अहवाल तयार करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात आठवडे बाजार भरणाऱ्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये काही गावांमध्ये तर बाजारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आठवडे बाजार भरणाऱ्या गावांमध्ये मतदान शाळांमध्ये होणार आहे. याचा सविस्तर अहवाल सर्व संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रावर आठवडे बाजारामुळे विपरीत परिणाम होणार नाही. परंतु, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत अहवालात सुचविण्यात आले होते.