पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात येणार असून, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) बरोबरच कर्नाटक पोलिसांच्या सशस्त्र तुकड्या तैनात राहणार आहेत. पुणे जिल्ह्यात १८ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यांपैकी सहा मतदान केंद्र बारामती मतदारसंघात आहेत, मावळ लोकसभा मतदारसंघात आठ संवेदनशील केंद्रे आहेत. त्यापैकी एक केंद्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या व उर्वरित रायगड पोलिसांच्या अखत्यारित आहेत. मुळशीत दोन आणि इंदापुरात एक मतदान केंद्र संवेदनशील आहे.
शिरूर मतदारसंघातील आंबेगाव येथे एक मतदान केंद्र संवेदनशील आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीत बारामती मतदारसंघाचे ७ मे रोजी तसेच शिरूर आणि मावळ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बारामती, शिरूर मतदारसंघ पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलात विभागला गेला आहे.
या मतदार संघातील निम्मा भाग रायगड जिल्हा पोलिसांच्या अखत्यारित येतो. बारामती मतदारसंघात १८०५ व शिरूर मतदारसंघात ११३७ मतदानं केंद्रे आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. बंदोबस्तास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कर्नाटक पोलिसांच्या आठ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मावळ मतदारसंघातील २१८ मतदान केंद्रांच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.