पिंपरी : प्रेमसंबंधातून अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना दिघी पोलीस ठाणे हददीत शनिवारी (ता.२०) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट क्र. तीनच्या पोलिसांनी काही तासात आरोपीला जेरबंद करण्यात यश आले.
ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय ३१ रा. खुटी पांगरी ता. मालेगाव जि. वाशिम सध्या रा. इंद्रायणी घाट आळंदी ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हददीत अंदाजे ३५ ते ४० वर्षाची अनोळखी महिला बेशुध्द अवस्थेत पडली होती. त्या महिलेच्या डोक्याला मार लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खुनाचा उलगडा करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले होते.
दोन्ही पथके सदर गुन्हयाचे समांतर तपास करीत होते. परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करीत असताना, एका पथकाला सदर महिले सोबत शेवटी कोण होते? या बाबत परीसरात तसेच आळंदी घाट परीसर, झोपडपटटी परीसरात चौकशी करत होते. पथक तपास करीत असताना, एक संशयित इसम हा वडगावरोड सुपरबाझार च्या पाठीमागील बाजुस मोटर सायकल घेवून थांबला असून त्याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे असल्याची माहिती पोलिसांना एका खबरीमार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पथक त्या ठिकाणी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपीचे महिलेसोबत प्रेम संबंध होते तो तिच्यासोबत लग्न करणार होता. परंतु ती इतर पुरुषासोबत दिसून आल्याने आरोपीला राग आला. आरोपीने चिडून रात्रीचे वेळी तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, आरोपी बाबत काही माहिती नसताना युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण समांतर तपास करुन व माहिती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट क्र. तीनच्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे व राहुल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.