पुणे : पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना जास्त घडतात. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. पुणे येथील लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्यामुळे लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाटमाथ्याची पाहणी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली.
या लोहमार्गावर 52 बोगदे आहे. तसेच डोंगरांची उंची 250 मीटरपर्यंत असून या मार्गावर अतिशय तीव्र वळणं आणि चढ आहे. यामुळे हा लोहमार्ग कठिण आहे. लोणावळा ते कर्जत घाटमाथा आणि मंकी हिल घाटाची पाहणी सरव्यवस्थापक यादव यांनी केली. दरवर्षी दरडी कोसळण्याचे ठिकाणं तपासून त्यांनी त्या ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सूचनाही अधिका-यांना केल्या.
तसेच काही ठिकाणी नवीन नाल्यांची बांधणी करण्याच्या सूचना तसेच डोंगरातील पाण्याच्या प्रवाहांची पाहणी, डोंगररांगांतून खाली येणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने वाहून जावे, यासाठीही उपाययोजना करण्याचे निर्देशनही त्यांनी दिले. यावेळी मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.