दीपक खिलारे
इंदापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत जे ठरलंय, त्या शब्दाची पूर्तता होईल. हा अजित पवाराचा शब्द आहे. त्यामुळे इंदापूरकरांनी काळजी करु नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पवार यांच्या विधानाने इंदापूर विधानसभेची महायुतीची उमेदवारी इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना की त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांना मिळणार ही चर्चा आता सुरू झाली आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचा मेळावा इंदापूरात आयोजित करण्यात आला. यावेळी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुतराव वणवे, अंकिता पाटील, निहार ठाकरे, भाजप तालुका अध्यक्ष शरद जामदार, विलास वाघमोडे, कृष्णाजी यादव, राजवर्धन पाटील, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे लोकशाही मजबूत झाली आहे. केंद्रात महायुतीचे सरकार येणार आहेत. त्यामुळे आपल्या केंद्राच्या योजना तालुक्यात राबविण्यात येणार आहेत. तालुक्याचा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक होते, लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मदत घेतली जाते. मात्र, विधानसभेला शब्द पाळला जात नाही, अशी कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखविली. मागील काळात आमचे वरिष्ठ नेते शब्द देत होते. मात्र, आत्ता तसे होणार नाही, असा शब्द पवार यांनी दिला.
20 वर्षे आमचा संघर्ष राष्ट्रवादीशी झाला
2014 आणि 2019 जे घडले त्याच्या जखमा अजून भरल्या नाहीत. 20 वर्ष आमचा संघर्ष राष्ट्रवादीशी झाला आहे. पुढे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती धर्म सगळ्यांनी पाळाला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला निकाल लागल्यावर आपल्या बसून करायच्या आहेत, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील म्हणाल्या.
सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचंय
आपला संघर्ष झाला तो राजकीय होता. पण वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव आमचा आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो. पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. तो आत्ता दूर झाल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
मेळावा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या घरी अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी स्नेहभोजन केले. या कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.