अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे आता सर्वत्र पसरले आहे. शिर्डीमधील लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झालेल्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. रुपवते यांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) प्रवेश केलाय. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते.
उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. परंतु, मविआच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली असून या मतदारसंघामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तसेच वंचितनं उमेदवारी जाहीर केल्यास वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होऊ शकेल.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलाय.
काही दिवसांपूर्वी उत्कर्षा रुपवते यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) भेट घेतली होती. भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच रुपवते आक्रमक झाल्या होत्या. रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी करत होत्या. त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी मागणी त्यांनी परत एकदा केलीय.
शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ठाकरे गटाने दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दल जनतेत उदासीनता असल्याने त्याचा फेरविचार पक्षाने केला पाहिजे, असेही उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे.
पुण्यातील् नामवंत उद्योजक विनोद अहिरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडे उमेदवारीची मागणी केली होती. अहिरे मुळचे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अकोल्यातील आंबेडकरांच्या ‘यशवंत भवन’ या निवासस्थानी आंबेडकरांची भेट घेतली होती. यामुळे वंचित कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.