शिरूर : डोंगराच्या पायथ्याशी हिरव्यागार झाडीत पिरसाहेबांचा दर्गा…नवस फेडण्यासाठी राज्यातून आलेले भाविक…यात्रेचा आनंद लुटण्यासाठी यांत्रिक खेळणी याबरोबरच शिरूर-जुन्नर तालुक्यातील ताशा-ढोल वाद्य कलाकारांनी लावलेल्या हजेरीने दरोडी (ता.पारनेर) येथील ख्याजा पिर शेख बहाऊद्दीन चिश्ती यांच्या ऊरूसाला रंगत चढली होती.
दरोडी (ता. पारनेर) या छोट्या गावात शनिवारपासून (ता. १३) यात्रेला प्रारंभ झाला. पीर शेख बहाऊद्दीन चिश्ती दर्गाह वक्फ बोर्ड ट्रस्ट दरोडी शरीफ यांच्या वतीने गावातून संदल काढण्यात आला. रविवार (ता. १४) आम्मी हुजूर चिरागा काढण्यात आला होता. यावेळी पारंपारिक वाद्याने शिरूर व जुन्नर तालुक्यातील वाद्य कलाकारांनी हजेरी लावली होती. जुन्या पारंपारिक वाद्यांबरोबर झांज पथक व नाशिक ढोलीबाजा कार्यक्रमाला रंगत चढली होती. या उरूसासाठी पुणे जिल्ह्याबरोबर नगर, नाशिक, मुंबई, या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.
सोमवार (ता. १५) मुख्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर पोलिस विभागातर्फे चादर चढविण्याचा कार्यक्रम पार पडला. या दिवशी कंदोरियाचा कार्यक्रम झाला. शेरे चढविणे, नैवेद्य व शेरणी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या काळात वाद्य कलाकारांनी जुन्या पद्धतीचे वाद्यकाम केले. नवबा, मोठी सवारी, लहान सवारी, चारचोपी, आठचोपी, तीन चोपी असे वादनाचे प्रकार पाहावयास मिळाले. जुने कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने हे जुने वाद्य काम दुर्मिळ झाले आहे.
यात्रेसाठी ट्रस्टच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्वयंसेवकांनी वाहनांसाठी केलेली सुविधा यामुळे गर्दी आटोक्यात आणण्यास मदत झाली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट असली तरी ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सुवीधा करण्यात आली होती. वेगवेगळ्या खेळणी व घरगुती वस्तूंची दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली होती. मंगळवार (ता. १६) सकाळी कुरानखानी करण्यात आली. त्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रे काळात वायज व मिलादचा कार्यक्रम झाला.