Ram Navami : आज रामनवमीनिमित्त देशभरात उत्साह पाहावयास मिळत आहे. प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामनवमी साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. भगवान रामाला दुग्धाभिषेकही करण्यात आला. चांदीच्या भांड्यातून दूध शंखात ओतून शंखाद्वारे रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला गेला. आज प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्य तिलक सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्याचा क्षण पाहण्यासाठी भक्तांनी राम मंदिरात गर्दी केली आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभू रामचंद्राची बालरुपातील मूर्ती म्हणजेच रामलल्लाची मूर्ती या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवण्यात आली.
देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत दर्शनाच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. याशिवाय दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. आज सर्वांच्या नजरा सूर्य टिलकांकडे लागल्या आहेत. दुपारी 12:16 वाजता सूर्य तिलक होणार आहे.
आज अयोध्येला दररोज पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजता रामलल्लाची जयंती उत्साहात साजरी केली जाईल. श्रीरामाच्या जयंतीनिमित्त सूर्यदेव प्रभू रामाचा तिलक करणार आहेत. डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.