पुणे : जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणी करण्यात
आली. मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे या मानधनाकडे लक्ष लागले होते. अखेर राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन जाहीर केले आहे.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारीपासून
सर्वेक्षण करण्यात आले होते. ३७ पानांच्या या सर्वेक्षणामध्ये १८२ प्रश्न ॲपद्वारे भरले गेले. एका कुटुंबातील माहिती
भरताना २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागल्याने मोठा वेळ द्यावा लागला होता. सर्वेक्षण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत प्रगणकांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडले. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, या सर्वेक्षणासाठी मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सर्वेक्षण दोन महिने होत आले आहे. मात्र, कोणतेही
मानधन प्रगणकांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रगणकांना त्यांचे मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी विविध संघटना करत होत्या.
…असे मिळणार मानधन
प्रगणकांना मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रतिकुटुंब १०० रुपये व मागासवर्गीय कुटुंबासाठी १० रुपये असे मानधन व
पाचशे रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात आला आहे. तर या कामासाठी नेमलेल्या वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना बेसिक वेतनाच्या ५० टक्के मानधन दिले आहे.
शिक्षकांच्या मानधनाबाबत त्रुटी असल्यास लेखी तक्रार करावी
मराठा सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांच्या मानधनाबाबत काही त्रुटी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार तहसीलदार यांच्याकडे करावी. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संघाचे मार्फत तक्रारी निवारणासाठी प्रयत्न केले जातील.
– संजय कुंजीर, प्रसिद्धी प्रमुख, पुणे जिल्हा शिक्षक समिती.