पुणे : यावर्षी पावसाच्या सरी उत्तम बरसणार आहे. पावसाळ्यातील या चार महिन्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान ही माहिती दिलेली आहे.
यावेळी पुढे ते म्हणाले, जगभरातील वातावरणाची स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. तसेच प्रशांत महासागरामध्ये यंदा एल-निनो सक्रिय असून, तो मध्यम अवस्थेत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल,आयओडी) सध्या निष्क्रिय आहे, तो जून महिन्याच्या सुरुवातीस सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी राहिल, ही सर्व स्थिती र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
काही भागामध्ये कमी प्रमाणात पावसाची शक्यता
भारतासह उत्तर भारत, दक्षिण भारतात उत्तम पाऊस पडण्याचा अंदाज असला तरीही,लडाख, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि छत्तीसगड,ओडिशा,पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात र्नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, त्यावेळी महिनानिहाय पावसाची शक्यता जाहीर केली जाईल,असे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे.
यावर्षी र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरीस सुधारित अंदाज जाहीर केला जाईल. त्यावेळी महिनानिहाय पावसाच्या अंदाजासह देशातील मोसमी पावसाच्या प्रगतीचा अंदाजही जाहीर केला जाईल.
डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक भारतीय हवामान विभाग
‘लानिना’मध्ये उत्तम पाऊस
- ला-निनाच्या काळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. १९७४ ते २००० या कालावधीमध्ये २२ वेळा ला-निना स्थिती सक्रिय होती.
- ला-निना काळात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, सरासरी वेळेत पाऊस देशभरात पोहोचतो.
- या २२ वर्षामध्ये मोसमी हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो स्थिती जाऊन, ला-निना स्थिती आल्याची घटना नऊ वेळा झाली आहे.