पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील सन २०२४-२५ मधील प्रवेशाची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (ता.१६) पासून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात ७५ हजार ९७४ शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के रीक्त असलेल्या ९ लाख ७२ हजार ८२३ जागा अद्ययावत केल्या आहेत. खाजगी शाळांसह शासकीय, अनुदानित शाळांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ७७ हजार ९२७ जागा रीक्त आहेत.
वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के राखीव जागांअंतर्गत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कॅन्टोमेंट बोर्ड, जिल्हा परिषद (प्राथमिक), महापालिका (स्वयंअर्थसहाय्यित), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खासगी अनुदानित (अंशत: अनुदानित वगळून) आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या बदलानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आरटीई ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार १६ एप्रिल पासून सुरु करण्यात आली आहे. तर ऑनलाइन अर्ज ३० एप्रिलपर्यंत करता येणार आहे . पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तरी याचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.