राहुलकुमार अवचट
यवत : गेल्या २०१४ च्या लोकसभेच्या प्रचारात ५० दिवसात पेट्रोल-डिझेलचे भाव ५० टक्के करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. या घोषणेचे काय झाले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने यवत येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
केंद्र सरकार हे लोकांसाठी उदासीन असून २०१४ ला झालेल्या लोकसभेच्या निमित्ताने पन्नास दिवसाच्या आत पेट्रोल-डिझेलचे कमी केले जातील असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आज जवळपास ३६५० दिवस उलटूनही भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. घरगुती गॅसचे भाव ४१० रुपये असताना यात देखील वाढ झालेली आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, मी राज्यासह देशातील अनेक मंत्रीपदे भूषवली. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मी देशाचा कृषीमंत्री असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, पुढे या काळात अनेक प्रकारची मदत केल्याने याच बाबींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी बारामतीच्या भाषणात कौतूक केले होते, ते म्हणाले होते मी पवार यांचे बोट धरून गुजरातमध्ये विकास केला. पण १० वर्षाच्या काळात आता तेच देश विरोधी भूमिका घेत आहेत.
मोदी यांच्या धोरणांवर टीका केल्यानेच कारवाया सुरू झाल्या असून केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत जे काम केले, ते बाहेरचे लोक पहायला येतात. पण फक्त टीका केली म्हणून केजरीवाल यांना तुरूंगात टाकले आहे. इडी, सीबीआय या संस्थेचा गैरवापर केला जात असून ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.
बारामतीतील संस्था ही देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे. बारामतीतीलं काम पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. दौंड तालुक्यातील शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी एका नेत्याला वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. विकासासाठी कधीही राजकारण मध्ये आणले जाणार नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.
विरोधात बोलणारे आता मांडीला मांडी लावून बसतात : रोहित पवार
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, कांदा शेतकरी अडचणीत असून त्यांना साधी मदत सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्याला ६ हजार देतो आम्ही शेतकऱ्यांना विकत घेतो, असे भाजपचे नेते खाजगीत बोलत आहेत. भाजपाला दोन समाजात आग लावणे जमते. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची किंमत यांनी केली आहे, विरोधात बोलणारे आता मांडीला मांडी लावून बसतात मग कार्यकर्त्यांनी काय करायचं असं सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.