पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी या उच्चभ्रू सोसायटीमधून क्रिकेट सट्टेबाजी चालवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकत दहा जणांना अटक केली आहे. सट्टेबाजांकडून मोबाइल संच, लॅपटॉप असा २ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुकेशकुमार शैलेन्द्रप्रसाद साहू (वय-२४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय-२१), जसवंत भूषणलाल साहू (वय-२२), राहुळकुमार गणेश यादव, रोहिटकुमार गणेश यादव (वय-२६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय-२३), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय-२४), मोहम्मद ममनून इस्माईल सौदागर (वय-३२, सर्व रा. छत्तीसगढ), संदीप राजू मेश्राम (वय-२१), अमित कैलास शेंडगे (वय-३२) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार प्रवीण ढमाळ (वय-५३) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील पटेल टेरेस या इमारतीमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, संगणक असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासणीमध्ये आरोपी विविध संकेतस्थळांचा वापर करून बेटींग घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.