पुणे : सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यामुळे अंगाची पुरती लाहीलाही होत आहे. असे असताना राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही झाला आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता असून, जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतात साधारणपणे एक जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. यावर्षी 87 सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकूण 106 टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
दुष्काळ, तापमानवाढ, गारपीट, पूर असे अनेक हवामान बदल घडत असताना देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा होती. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात आशादायी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारतातील ईशान्य, वायव्य, पूर्व भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या भूमध्यरेखीय प्रशांत महासागरीय क्षेत्रात अल निनो मध्यम स्थितीवर सक्रीय असून, जलवायू मॉडेलच्या पूर्वअनुमानानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला अल निनोची स्थिती तटस्थ होण्याचाही अंदाज आहे.