पुणे : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा हुक्का बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पारगेनगर येथील हिंदुस्तान हाऊसमधील ‘कॅफे २६’ मध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का बारला पोलिसांनी सील ठोकले. ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. यामध्ये हुक्का व तंबाखूजन्य पदार्थ तसेच हुक्का फ्लेवर्स, हुक्का पॉट, व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश भरत सोनार (वय-२४, रा. फ्लॅट क्रमांक १०१, वलटेक्स प्लाझा, मार्केटयार्ड), जीवन बलवंत धामे (वय-२२, रा. १०३, मौर्या अथर्व सोसायटी, बी. टी. कवडे रोड), प्रेम लालजी सिंग (वय-१९, रा. शिंदे वस्ती, मगरपट्टा, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. यामधील सोनार हा कॅफेचा मालक तर, धामे हा वेटर असून प्रेम सिंग हा कुक म्हणून काम करत आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार श्रीरंग लोंढे (वय-४५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कॅफे ३६ या ठिकाणी बेकायदा हुक्काबार चालवला जात असल्याची माहिती अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बिबवेवाडी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, निरीक्षक लोंढे आणि त्यांच्या पथकाने कॅफे वर छापा टाकला.
यावेळी काही ग्राहक त्यांच्या समोर हुक्क्याचे पॉट ठेवून धूम्रपान करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर कॅफेची तपासणी करून हुक्काबारची झाडाझडती केली असता पोलिसांना काचेचे १५ पॉट, १५ चिलीमसह त्याला जोडलेले १५ हुक्का पाईप, तंबाखुजन्य फ्लेवरची ६ पाकिटे, तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरची दोन पाकिटे, हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे फिल्टरची पाकिटे असं २३ हजार ४०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.