नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात 19 आणि 26 एप्रिल, 7, 13, 20 आणि 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात देशातील विविध घटकांच्या विकासावर भर दिला आहे.
पंतप्रधान मोदी वारंवार म्हणाले आहेत की, त्यांच्या मते देशात फक्त चारच जाती आहेत – तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणूक आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्पांची पूर्तता करण्याचा रोडमॅप सादर केला आहे.
जाणून घेऊया भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या गोष्टी-
- मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे.
- दर महिन्याला मोफत वीज देणार
- पर्यावरणपूरक शहरे विकसित करणार
- तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे वचन
- महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडणार
- नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधणार
- पेपरफुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणार
- ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आयुष्मान योजनेत आणण्याचे वचन
- भाजीपाला उत्पादन आणि साठवणुकीसाठी नवीन क्लस्टर तयार करणार
- 80 कोटी कुटुंबांना पाच वर्षे मोफत रेशन योजनेचा लाभ
- आयुष्मान योजनेंतर्गत ट्रान्सजेंडर देखील समाविष्ट केले जातील.
- हर घर जल योजनेचा विस्तार
- सरकारची उज्ज्वला योजना सुरूच राहणार आहे.
- राष्ट्रीय किमान वेतनाचा आढावा.
- एमएसपी वाढतच राहणार
- प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर देण्याची योजना सुरूच राहणार आहे.
- स्वानिधी योजना गावोगावी पोहोचवली जाईल.
- प्रत्येकाला आरोग्य विमा दिला जाईल.
- सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीवर कडक कारवाई.
- मच्छीमारांसाठी विमा योजना.
- समान नागरी कायदा (UCC) लागू केली जाईल.
- वंदे भारत गाड्यांचा विस्तार केला जाईल. या अंतर्गत वंदे भारतचे तीन मॉडेल – वंदे भारत स्लीपर, वंदे भारत चेअरकार आणि वंदे भारत मेट्रो धावतील.
- मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.