पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११, तर तामिळनाडूमधील १ अशा १२ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या (युनेस्को) यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने युनेस्कोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे येथील गडकिल्ल्यांवर प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. तसेच राज्य आणि केंद्र शासनाकडून मूलभूत बदलांबाबत आवश्यक सूचना करून जून महिन्यापर्यंत विस्तृत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. गडकिल्ल्यांच्या आजूबाजूच्या परिसरांचा विकास होणार असून, गडकिल्ल्यांमध्ये आणि परिसरात झालेली खासगी आणि शासकीय अतिक्रमणे काढण्यासंदर्भात प्रथम स्थानिक प्रशासनाने सविस्तर अहवाल तयार करावा, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत दिल्या.
राज्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांचे जतन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने सप्टेंबर २०२२ मध्ये युनेस्कोला गडकिल्ल्यांसंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तब्बल एक वर्षानंतर युनेस्कोकडून ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नामांकनाला सहमती देण्यात आली. १७ व्या शतकात बांधलेल्या गडकिल्ल्यांचा वारसा त्यांच्याभोवती असणारी तटबंदी, समृद्ध पाहणीसंदर्भात नियोजन केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली २२ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीमध्ये पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, पर्यटन संचालनालयाचे संचालक, सर्व जिल्हाधिकारी आणि विषयतज्ज्ञांचा समावेश आहे. त्यानुसार करीर यांच्या अध्यक्षतेखाली युनेस्कोच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडल्यानंतर युनेस्कोने प्रत्यक्षात गडकिल्ल्यांची पाहणी केली आहे. त्यानुसार अनेक सूचना देण्यात आल्या.
या किल्ल्यांचा समावेश
पुणे- लोहगड, शिवनेरी, राजगड
कोल्हापूर- पन्हाळा
सिंधुदुर्ग- विजयदुर्ग, सिंधुदुर्ग
सातारा- प्रतापगड
रायगड- खांदेरे, रायगड
नाशिक- साल्हेर
रत्नागिरी- सुवर्णदुर्ग
तामिळनाडू- जिंजी