लोणी काळभोर, ता.13 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 45 वर्षीय शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रुपनर वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे.
मल्हारी महादू रुपनर (वय 45 रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर, ता.हवेली, पुणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी रुपनर यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
मल्हारी रुपनर हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरी आले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मल्हारी रुपनर हे घरात दिसले नाही. त्यामुळे मल्हारी यांचे पत्नी व मुलीने त्यांचा शोध घेतला असता, मल्हारी रुपनर हे बाथरूमच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार केतन भेंडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मल्हारी रुपनर यांना खाली काढले. त्यांना लोणी काळभोर येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
कर्जाचा होता बोजा
मल्हारी रुपनर यांनी शेती करण्यासाठी सोसायट्यांचे व हात उसने स्वरूपात अनेक लोकांचे कर्ज घेतले होते. त्यांनी शेतात मेथी व कोथिंबीर लावली होती. मात्र, उन्हाळ्यामुळे उभ्या रानातील पीक जळून गेले होते. मग हे डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती मिळत आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.