शिरूर : शैक्षणिक संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे. बापूसाहेब गावडे विद्यालयात पोकळे, ढोरके, जाधव यांनी आदर्श काम करत संस्थेला प्रगतीच्या मार्गावर आणले. त्यामुळेच ग्रामविकास शिक्षण संस्था भरभराटीला आल्याची भावना शिरूर तालुक्यांचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केली.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त लिपिक सुनिल पोकळे, शिपाई शांताराम जाधव, महादु ढोरके यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार पोपटराव गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषदेच्या सभापती सुनीता गावडे, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे ,पंचायत समिती माजी सदस्य डॉ सुभाष पोकळे, घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे, सुहास थोरात, माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजीं निचित, सरपंच बिपीन थिटे, सरपंच भाऊसाहेब किठे, सरपंच शुभांगी पडवळ, सोमनाथ भाकरे, उपसरपंच गोविंद गावडे, सतिष थोरात, सपंत पानमंद, विक्रम निचित, नवनाथ निचित, प्रकाश वायसे, विस्तार अधिकारी एकनाथ बाजारे, चांदाशेठ गावडे, डॉ हेमंत पवार, दिनकर घोडे, बबुशा कांदळकर, प्राचार्य आर.बी. गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावडे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीमध्ये अनेकांनी मोलाची मदत केल्यांने ग्रामविकास शिक्षण संस्था प्रगती करीत असुन या मधे घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करताना पाहुन अभिमान वाटतो.
प्रदीप वळसे पाटील म्हणाले की ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून या भागात हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करू शकले यामध्ये शिक्षक व सेवकांचे मोठे योग योगदान आहे.
या वेळी सहसचिव सुनिता गावडे म्हणाल्या की संस्थेतील सेवक व संस्था परिवार या मधे एक कौटुंबिक नाते तयार झाले असुन, त्यामुळे सेवा निवृत्त झालेले शिक्षक आजही संस्थेच्या हितासाठी सदैव तत्पर असतात.
यावेळी डॉ सुभाष पोकळे यांनी शाळेच्या कामाच्या गौरव करीत तालुका पातळीवर आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे शाळेचे कौतुक केले. या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित यांचे स्वागत प्राचार्य आर. बी. गावडे यांनी केले. सूत्रसंचालन डी. एम. निचित यांनी तर संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.