पुणे : काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता ते पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याच्या तोंडाला फेस येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पुण्यात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल
नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेलं काम हे काँग्रेसला मागील 50 वर्षात जे जमलं नाही ते काम केलं. जगात देशाची प्रतिमा उंचावली असून देश बोलतो ते जग ऐकत आहे असं वातावरण आहे. कोरोना काळात काही लोक घरात बसून होते ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. त्यांनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. बोलताना जरा भान बाळगा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे याचं नाव न घेता टीका केली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून आपली नैसर्गिक युती
कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो तेव्हा सर्वत्र राज्यात महायुती वातावरण दिसून येत आहे. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर आहे. पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे.
त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.