पिंपरी, (पुणे) : पुण्यात वाहतूक पोलिसाच्या अंगावर मोटार घालून जखमी केल्याची घटना घडली आहे. वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले. या घटनेत वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल मोटे (वय ३०) असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. प्रशांत संतोष कदम (वय २० रा. निरगुडी, हवेली) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पोपटराव टेमगिरे (वय-३९) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई मोटे हे दिघी आळंदी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. चऱ्होली गावातून अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी ते सहकारी पोलिसांसह वाहतूक नियमन करत होते. दुपारच्या सुमारास चऱ्होली गावाकडून आरोपी प्रशांत चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन आला. या वाहनाला काळ्या काचा होत्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, प्रशांत याने वाहन अजून अधिक वेगात चालवले. त्यामुळे पोलीस शिपाई मोटे यांनी पुढे होऊन वाहन चालकाला थांबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने भरधाव चारचाकी मोटे यांच्या अंगावर घातली. यामध्ये मोटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, खांद्याला, पायाला मार लागला आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.