पुणे : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नववर्ष दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच दिवसाला आपण गुढीपाडवा देखील म्हणतो. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस महत्वाचा मानला जातो.
गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभदिवस आहेत. गुढीपाडवा हा साडेतीनमुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करुन, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या सणाला लोक आंब्याच्या पानांचे हार घालून घर सजवतात. रांगोळी काढून गुढीपाडव्याच्या दिवशी घरी गोड पुरणपोळी, श्रीखंड बनवून कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. गुढीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि विजय प्राप्त होते.
गुढीपाडव्याची आख्यायिका (पुराण)
ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते. ही एक पुराणातील आख्यायिका आहे. तसेच रामायण काळामध्ये प्रभू श्री राम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याकडे आले होते. त्यावेळेस अयोध्यावासीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते.
शुभ मुहूर्त
यावर्षी गुढीपाडवा हा सण 09 एप्रिल 2024 रोजी आहे. या दिवशी सकाळी 09:12 ते दुपारी 01:58 या मुहूर्तावरती सर्वांनी गुढी उभारावी. ही गुढी आपल्या घराकडे तोंड करून उभरावी. या गुढीवरती तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरगाठ बांधलेली असावी. त्यावर हळदीकुंकू वाहवे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी पुरणपोळी अथवा गोडपदार्थ बनवावेत. आणि त्याचा नैवेद्य गुढीला आणि देवाला दाखवावा.
गुढीवरती कलश उलटा का ठेवतात?
गुढीवरती जो आपण कलश लावतो तो कलश हा ब्रम्हध्वजाचे प्रतीक म्हणून मानले जाते. ज्या कलशातून साखरगाठ, नवीन वस्त्रे, कडुलिंबाचा पाला अशा विविध गोष्टी आपल्या घरी समृद्धी यावी, यासाठी बांधल्या जातात. या सर्वांचे प्रतीक म्हणून हा कलश उलटा ठेवला जातो.
कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला आणि कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला कडूलिंबाचा पाला बांधतो. तसेच या दिवशी गुळ आणि कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद देखील खाल्ला जातो.