आणे (पुणे) : शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना कोल्ह्याची दोन पिल्ले आढळून आली. ही कुत्र्याची पिल्ले असल्याचे या ऊसतोड कामगारांना वाटले. कामगारांनी तब्बल पंधरा दिवस कुत्र्याची पिल्ले म्हणून सांभाळली. सदर बाबत निमगाव
गावाचे सामाजिक कार्यकर्ते अजित गाडगे यांच्या निदर्शनास आले. ही कुत्र्याची पिल्ले नसून कोल्ह्याची पिल्ले असल्याचे संबंधित ऊसतोड कामगारांना सांगितले. सदरची माहिती अजित गाडगे यांनी तत्काळ वन विभागाला कळवली. वनविभागाने ही पिल्ले माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केली. वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक महेश जगधने यांनी केली. सदर पिल्लांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शिंदे यांनी दिली.