पुणे : पैशांसाठी आईचा डोक्यात हातोड्याने मारून खून करण्यात आल्याची घटना वडगाव शेरीमध्ये उघडकीस आली आहे. मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनाव करण्यात आला. परंतु, नातेवाईकांनी या मृत्यूबाबत संशय असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. त्यानंतर हा खुन असल्याचे उघड झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योशिता गोखले ही मृत मंगल गोखले यांची मुलगी आहे. तिने आपल्या मित्राच्या मदतीने मंगल यांच्या बँक खात्यामधून परस्पर पैसे काढले. पैसे काढल्याचे आईला समजले, तर ती रागावेल अशी भीती योशिताला वाटत होती. त्यामुळे तिने आपल्या आईचा खून करण्याची योजना आखली. तिने मित्र असलेल्या यशला घरी बोलावून घेत त्याला घरातील हातोडा दिला. मंगल या घरात झोपलेल्या असतानाच आरोपी यश शितोळे याने त्यांच्या डोक्यात हातोड्याने मारण्यास सुरुवात केली. यावेळी योशिताने आईचे तोंड स्कार्फने दाबलेले होते. त्यानंतर, आई मोरीमध्ये पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव केला. दरम्यान, मंगला यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे याबाबत संशय असल्याचे सांगितले.
परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.