पुणे : ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक तोळा अर्थात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1182 रुपयांनी वाढून 71,064 रुपये झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याचा भाव केवळ 3 महिन्यांत 7,762 रुपयांनी वाढला आहे. 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,302 रुपये होता. आता या दरात मोठी वाढ झाली आहे.
‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार, ट्रेडिंगदरम्यान चांदीनेही आज नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 2287 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदी प्रतिकिलो 81,383 रुपयांवर पोहोचली आहे. 2023 च्या सुरुवातीला सोन्याचा भाव 54,867 रुपये प्रति ग्रॅम होता, जो 31 डिसेंबर रोजी 63,246 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच 2023 मध्ये त्याची किंमत 8,379 रुपयांनी म्हणजे 16 वाढली आहे. त्याचवेळी चांदीचा भावही 68,092 रुपयांवरून 73,395 रुपये प्रतिकिलो झाला.
येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर चांदीचा दरही 85 हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.
पुण्यात सोन्याचा भाव 70 हजार पार
पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव 70 हजार पार झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 84 हजार रूपये प्रतिकिलोवर गेले आहेत. अजूनही या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.