केडगाव: सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेटचे आहे. यामुळे किशोरवयीन मुले व मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. या गोंधळलेल्या स्थितीतून त्यांना सावरण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा 24 ते 21 वयोगटातील मुले चांगले विचार आत्मसात करतील, तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि अनुचित प्रकार कुठेतरी थांबतील. त्यासाठी 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त रविवार (7 एप्रिल) रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार वसंत हंकारे याचे देलवडी येथे सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने विनामूल्य व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी बोलतांना वसंत हंकरे म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आईविषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो. पण, वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते, याचा अर्थ हा नाही की, ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा वडिल व्यक्त होत नाही आणि आपणसुद्धा त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करायला घाबरतो. आयुष्यात वडिलांचे स्थान खूप मोठे आहे. त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करणे किंवा प्रेम व्यक्त करणे खूप गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची जयंती फक्त साजरी करून चालणार नाही, तर त्यांचा इतिहास काळजात रुजवला पाहिजे, तरच सामाजिक प्रबोधन होईल. डॉ. बााबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जगाच्या घटनांचा अभ्यास केला म्हणूनच 75 वर्ष उलटूनही राज्यघटना व्यवस्थित सुरु आहे, त्याचे ऋण व्यक्त केले पाहिजेत .डॉ बाबासाहेब आंबेडकर 1913 रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच त्यांचा पुत्र रमेशने शेवटचा श्वास घेतला, तरीही 7 कोटी जनतेला न्याय मिळावा म्हणून हातातील पुस्तक खाली ठेवले नाही. मुलांनो आयुष्यातील वेळ वाया घालवू नका. आई- वडीलाच्या कष्टाचे पांग फेडा. जसे की” पुत्र व्हावा ऐसा, त्यांचा तिन्ही लोकी झेंडा”, ज्याला बाप कळला त्याला विश्व कळले, असे मत वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार राहुल कुल, भिमा पाटसचे संचालक विकास शेलार,सभापती शिवाजी वाघोले, संचालक तुकाराम ताकवने, रविंद्र कांबळे (आरपीआय पुणे जिल्हा उप अध्यक्ष.) विकास कदम आरपीआय पुणे जिल्हा उप अध्यक्ष),ईश्वर भालेराव (अध्यक्ष महाराष्ट्र क्रांती सेना )विनोद भालेराव (नगरसेवक शिरूर),अश्विन वाघमारे (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दौंड तालुका ) निलम काटे (सरपंच ), किशोर शेलार (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) ,गावातील सर्व पदाधिकारी, सिद्धार्थ तरुण मंडळाचे सदस्य,ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.