संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये सायंकाळच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी व चारचाकी आलिशान गाड्यांचा ताफा काढून कर्कश आवाजाचा हार्न वाजवत आणि आरडाओरडा करत रॅली काढणाऱ्या तीस जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे, सुनिल गरड, विशाल भालेराव, सुनिल राहूल गरड, युवराज अनिल दामोदरे, योगेश संजय दामोदरे, किसन भगवान कांबळे, सुरज गोरख गरड, सागर घोडके, (सर्व रा. वरवंड ता. दौंड जि.पुणे ) व इतर 15 ते 20 अनोळखी व्यक्ती अशी गुन्हे दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 15 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या वरवंड येथील विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे याने त्याच्या वाढदिवसानिमित्त 10 ते 15 मोटारसायकल तसेच 5 ते 6 चारचाकी वाहनांमधून 25 ते 30 अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून काही मोटारसायलकवर ट्रिपल सिट बसवले. तसेच चारचाकी वाहनांच्या काचा खाली घेऊन खिडकीमधून बाहेर येत हातवारे करून गावामधील लोकांना त्रास होईल, अशा पध्दतीने मोठमोठ्याने आरडाओरडा केला. याशिवाय, गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवून नवीन विठ्ठल मंदिर ते मुख्य चौकापर्यंत धिंगाणा घातला.
यामुळे गावातील शांततेचा भंग निर्माण होईल असे वर्तन केले. तसेच या संदर्भाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत होती. या प्रकाराची त्वरित दखल घेत पाटस पोलीस चौकीचे फौजदार सलीम शेख यांनी वरवंड येथील पोलीस पाटील किशोर दिवेकर यांना याबाबत माहिती घेऊन कळवण्यास सांगितले.
पाटस पोलिसांनी या संदर्भात गावात या घटनेची चौकशी केली असता, सोन्या दामोदरे याने त्याच्या वाढदिवसानिमित्त 10 ते 15 मोटारसायकल तसेच चॉकलेटी रंगाची अल्टो, पांढऱ्या रंगाची क्रेटा, लाल रंगाची 302 नंबरची स्विप्ट, ग्रे रंगाची इनोव्हा अशा चारचाकी वाहनांमधून 15 ते 20 अनोळखी व्यक्तींनी गावामध्ये शांततेला भंग होईल असे वर्तन केले असल्याचे दिसून आले. त्या सर्वांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस शिपाई हनुमंत खटके यांनी याबाबत फिर्याद दिली.
दरम्यान, या फिर्यादीवरून मुख्य आरोपी विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे याच्यासह तब्बल तीस जणांवर गुन्हे दाखल केले. याप्रकरणाचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार भानुदास बंडगर करत आहेत.