पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 21 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथे घडली आहे. तरुणीला लग्न करण्यासाठी त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 वर्षीय प्रियकरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उत्कर्षा संतोष लोंढे (20, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. उत्कर्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्य चंद्रकांत ढावरे (25, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्कर्षाचे वडील संतोष लोंढे (४५) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षाचे आरोपी आदित्य याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आदित्यच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती. उत्कर्षा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करु, असे तिने आदित्यला आणि तिच्या घरच्यांना सांगितले होते. दरम्यान, आदित्यच्या आईचे आजारपणात निधन झाले.
घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच वर्षी लग्न केले नाही, तर तीन वर्षे लग्न करता येत नसल्याची प्रथा आपल्या घरात असल्याची माहिती आदित्यने फिर्यादी व त्यांच्या मुलीला दिली. आदित्याने उत्कर्षाकडे आत्ताच लग्न कर म्हणून तगादा लावला होता. तसेच सतत मानसिक त्रास दिला. उत्कर्षाला आताच आदित्य सोबत लग्न करायचे नव्हते. मात्र आदित्यकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून उत्कर्षाने राहत्या घरातील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करत आहेत.