पुणे : पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदली झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता. २०) उघडकीस आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी येथे भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आला होता. सदर महिलेचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर, थेरगाव परिसरातील एका मृत महिलेचे देखील शवविच्छेदन करण्यात आले होते. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते.
थेरगाव येथील मृत महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनगृहातून मृतदेह बुधवारी (ता. २०) सकाळी नेला. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तो मृतदेह दापोडी येथील मृत महिलेचा होता.
त्यानंतर दापोडी येथील मृत महिलेचे नातेवाईक मृतदेह घेऊन जाण्यासाठी शवविच्छेदन गृहात आले. त्यावेळी त्यांना थेरगाव येथील मृत महिलेचा विच्छेदन केलेला मृतदेह देण्यात आला. मात्र संबंधित मयत व्यक्ती आपले नातेवाईक नसल्याचे दापोडी येथील नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, दापोडी येथील महिलेचा मृतदेह थेरगाव येथे नेण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दापोडी येथील महिलेच्या नातेवाईकांना समजले. त्यानंतर नातेवाईकांनी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस दोन्हीकडील नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.