पुणे : खडकवासला धरणाजवळ कार आणि दुचाकीचा झालेल्या अपघाताचे रुपांतर वादामध्ये होऊन तरुणाचा खून करणाऱ्या दोन जणांना हवेली पोलिसांनी मंगळवारी (ता. १८ ) बेड्या ठोकल्या आहेत.
ऋषिकेश तांबे (वय ३०, रा. गोळेवाडी, डोणजे, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी करण दारवटकर (वय २३, रा. धायरी) आणि रोहन पवार (वय २३, रा. धायरी) यांनी हवेली तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक ऋषिकेश तांबे व त्याचे मित्र करण दारवटकर आणि रोहन पवार हे मंगळवारी (ता.१८ ) सकाळी खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंती जवळून दुचाकीवरून चालले होते. तेव्हा एका अज्ञात चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यांमध्ये दुचाकीवरील तिघेही खाली पडले. त्यानंतर कारमधून आरोपींनी कोयत्याने ऋषिकेशच्या डोक्यात व चेहऱ्यावर वार केले. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या रोहन व करण यांना देखील मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच, हवेली पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी खुन झालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात आरोपीन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, हवेली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तरी, पुढील तपास हवेली पोलीस करीत आहे.