अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती, (पुणे) : लाख दोन लाख नव्हे तर केवळ पाच रुपयाचा पारले बिस्कीट पुडा चोरल्याच्या संशयावरून दोन कुक्कुटपालन कामगारांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना आंबळे (ता. शिरूर) परिसरात शुक्रवारी (ता. २९) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सुरेश चौधरी (रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर, जि. पुणे) व सार्थक खंडू काळे अशी मारहाणीत जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर अमोल साळबापु अनोसे, दादा रामदास अनोसे (दोघेही रा. अनोसेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) व त्यांच्या दोन अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय चौधरी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौधरी व त्यांचे मित्र सार्थक काळे, कुणाल काळे, हरिओम पासवान हे पोल्ट्री फॉर्मवर कोंबडया भरून देण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे विजय चौधरी व त्यांचे मित्र विशाल देशमुख (रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या पोल्ट्री फॉर्मवर कोंबडया भरून देण्याचे काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, काम आटोपल्यानंतर चौघेही केसरी हॉटेलच्या उजव्या बाजुला असलेल्या अमोल घोरपडे यांच्या चहाच्या टपरीजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते.
दरम्यान, अमोल घोरपडे यांनी चहा संपल्याचे सांगितल्यानंतर एका कामगाराने पारले बिस्कीट पुडा घेतला आणि पैसे देणारच तेवढ्यात आरोपींनी “पैसे न देता बिस्कीटपुडा खिशात घातला, तुम्ही चोरी केली असे बोलून विजय चौधरी व सार्थक काळे यांना शिवीगाळ करून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.