सातारा : सातारा या लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. खासदार शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले असतानाच पाटलांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर महायुतीकडून मैदानात उतरणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण शड्डू ठोकणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉलर उडवली आहे. पवार यांनी कॉलर उडवून एका प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिले आहे. शरद पवारांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेचा ठरत आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले यांना चांगलीच कसरत करावी लागली. ते काही दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. आपल्यालाच तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते, अशी जोरदार चर्चा होती. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्नविचारला. त्यावर उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे कोणतेही बोलणे झालेले नाही, असे पवार यांनी सांगितले. पुढे पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन्ही हातांनी थाटात कॉलर उडवली. शरद पवारांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनादेखील हसू आवरता आले नाही.