मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 14 वर्षीय मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी २६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी मालवणी येथील खारोडी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. वयाच्या १४ व्या वर्षी तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला भयंकर त्रास होत होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. यामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोण नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आणि स्थानिकांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला उपचारासाठी कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता, त्यांना या प्रकरणात कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.