नवी दिल्ली : उत्तम ज्ञान, चांगला अनुभव असला की व्यक्ती त्याच्या क्षेत्रात तज्ज्ञ होऊ शकतो. त्यात गुगलसारख्या कंपनीत नोकरी मिळणे म्हणजे देखील नशीब लागतं असं म्हटलं जातं. कारण कंपनीकडून आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गलेलठ्ठ पगार दिला जातो. त्यात गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर राघवन यांच्या नावाची चर्चा आहे, ती म्हणजे त्यांना वर्षाला मिळालेल्या ३०० कोटींच्या पॅकेजची.
गुगलपासून ते मायक्रोसॉफ्टपर्यंत टॉप टेन कंपन्यांमध्ये अनेक भारतीयांनी त्यांचा झेंडा रोवला आहे. सुंदर पिचाई, सत्या नडेला, शांतनु नारायण, निकेस अरोरा, नील मोहन, अरविंद कृष्णा, पराग अग्रवाल, संजय मेहरोत्रा यांच्यासह अनेक जण मोठ्या हुद्द्यावर आहेत. यामध्ये एक नाव म्हणजे प्रभाकर राघवन.
राघवन हे सध्या गुगलमध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहेत. एका रिपोर्टमधील दाव्यानुसार, गुगलने त्यांना पगारापोटी २०२२ मध्ये जवळपास ३०० कोटी रुपये मोजले होते. दिग्गज जागतिक कंपन्यांमध्ये भारतीयांचा सध्या बोलबाला आहे. ते याठिकाणी गुगल सर्च, असिस्टंट, जाहिरात आणि पेमेंट प्रोडक्ट्स यासारख्या कामांवर देखरेख करत आहेत.