मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही. राष्ट्रवादीकडून उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ हे चिन्ह त्यांना वापरता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. त्यामुळे त्या राज्यांतील निवडणुकीत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळणारच आहे. तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तीन दिवसांपर्यंत कॉमन चिन्हासाठी केलेला अर्ज ग्राह्य धरला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसने 24 मार्च रोजी अर्ज केला. परंतु, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्च रोजी निघाली आहे. केवळ एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. लक्षद्वीपमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुक होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही.