नितीन करडे
उरुळी कांचन (पुणे) : वळती (ता. हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर मंगळवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वळतीसह आसपासच्या परिसरातील शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे पावसामुळे वळती गावाच्या हद्दीतील चार छोटे – बंधारे फुटल्याने, पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरल्याने उरुळी कांचन शहरात पाणी शिरल्याने ओढ्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले असले तरी, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील घरे व दुकानांच्या नुकसानीस मानवनिर्मित असल्याचे दिसून येत आहे. वळती येथून शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरलेल्या ओढ्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वळतीहून आलेल्या पाण्यामुळे ओढ्याच्या लगत हाहाकार माजवल्याचे दिसून आले आहे. डाळींब व शिंदवने गावातून आलेल्या व उरुळी कांचन शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या दोन्ही ओढ्यांची अवस्था छोट्या गटाराहून अधिक वाईट असल्याचे दिसून येत आहे.
वळती व डाळींब (ता. दौंड) या दोन गावाच्या हद्दीतील डोंगरात उगम पावणारे दोन ओढे उरुळी कांचन शहरात एकत्र होऊन, दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात. डाळींब परिसरातून आलेला ओढा पांढरस्थळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाच्या खालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. तर वळतीहून निघालेला ओढा शिंदवने मार्गे जेजुरी रस्त्याजवळून व पुणे-सोलापुर महामार्गाखालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. सायरस पुनावाला शाळेजळ दोन्ही ओढे एक होऊन, रेल्वेखालील मोऱ्यातून दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात.
वळती घाटमाथ्यावर पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस
वरील दोन्ही ओढ्यावर, ओढ्यालगतच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत. पंचवीस वर्षापूर्वी शंभर फुटाहून अधिक रुंदी असलेले ओढे, सध्या दहा फूटीचे रुंदीचेही उरलेले नाहीत. ओढ्यालगत अनेक व्यावसायिकांनी दुकान, टपऱ्या टाकून अतिक्रमण करुन पुर्णपणे वेढले आहे. यामुळे वळती व डाळींब भागातील घाटमाथ्यावर थोडाफार पाऊस झाला तरी, उरुळी कांचन शहरातील रस्ते व दुकाने पाण्याखाली हे समीकरण ठरलेले आहे.
दरम्यान, पावसाचे पाणी ओढ्यात मावत नसल्यानेच, पाणी इंदिरानगर, उरुळी कांचन शहरातील बाजारपेठ, बाजारमैदानात शिरल्याने हाहाकार उडत आहे. वळती परिसरातील पाऊस संपून, पंधरा तासाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही उरुळी कांचन शहरातील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत होते. वळती येथुन आलेल्या ओढ्यातले पाणी रेल्वेखालील नऊ मोऱ्यात बसत नसल्याने, गावात पाण्याचा फुगवटा येणार आहे.
याबाबत उरुळी कांचन येथील सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “ग्रामपंचायत प्रशासन, लोणी काळभोर पोलीस व इतर शासकीय विभागाच्या वतीने मदतीसाठीच्या सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहेत. ओढ्या काठच्या लोकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर इंदिरानगर झोपडपट्टीतील लोकांना इतरत्र हलविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.”