बारामती : बारामती एमआयडीसी येथील आय. एस. एम. टी. कंपनीमधील २६ लाखाच्या लोखंडाचे रोल चोरणाऱ्या ७ जणांना बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह संपूर्ण माल असा ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कैलास शांताराम लष्कर व त्याचे तीन साथीदार आकाश लहू ननवरे (वय-२१ ) २) आशिष कांतीलाल लष्कर (वय २०) आणि आकाश सुनील जाधव (वय १९, सर्व रा. राक्षेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर सलमान इम्तियाज खान (वय २६, रा.बारामती, जि.पुणे), धर्मेंद्र कुमार राजकुमार चौधरी, वय ३८ वर्षे, रा. भिगवन, ता. इंदापूर) आणि सुरेश लोकलकर उर्फ तेजा शेठ, वय ४० वर्षे, रा. तुळजाभवानी नगर जालना) अशी चोरीचा माल घेणाऱ्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. याप्रकरणी आय. एस. एम. टी कंपनीचे व्यवस्थापक संजय श्रीमंत मसतुद यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजय मसतुद हे बारामती एमआयडीसी येथील आय. एस. एम. टी. कंपनीत व्यवस्थापक या पदावर काम करीत आहेत. अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे तारेचे कंपाउंड तोडून कंपनीमधील २६ लाख रुपये किंमतीचे लोखंडाचे रोल २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत चोरून नेले. याप्रकरणी मसतुद यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लगुटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाला आय एस.एम.टी. कंपनीमध्ये सेक्युरिटी म्हणून नोकरी करत असलेला कैला लष्कर व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी चोरी केली असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी कैलास लष्कर व त्याचे तीन साथीदार आकाश ननवरे, आशिष लष्कर आणि आकाश जाधव यांना राशीन (ता. कर्जत) येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह संपूर्ण माल असा ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी कैलास लष्कर, आकाश ननवरे, आशिष लष्कर आणि आकाश जाधव यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच चोरीचा माल बारामती येथील सलमान खान, भिगवण येथील धर्मेंद्र राजकुमार आणि जालना येथील सुरेश लोकलकर यांना विकला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर आरोपींनाही अटक केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे करीत आहेत.
सदरची कामगिरी बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, योगेश लगुटे, राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे, दत्ता मदने, शशिकांत दळवी, दीपक दराडे आणि रचना काळे यांच्या पथकाने केली आहे.